


बर्दापूर : सरस्वती न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल, बर्दापूर येथे मुख्याध्यापक श्री. मधुकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बालसुरक्षेचा संदेश देणारा विशेष जनजागृती उपक्रम उत्साहात व उपक्रमशील वातावरणात राबविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत जागृती निर्माण करणे, स्वयंरक्षणाचे महत्त्व पटवून देणे तसेच मानसिक, शारीरिक व सामाजिक सुरक्षिततेविषयी सजगता वाढविणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या निमित्ताने शाळेत बालसभा आयोजित करण्यात आली. या बालसभेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनातील अनुभव, अडचणी व सुरक्षिततेविषयीचे विचार मनमोकळेपणाने मांडले. विद्यार्थ्यांना भावना मोकळेपणाने व्यक्त करता याव्यात तसेच समस्या दडपून न ठेवता त्या सांगता याव्यात, या उद्देशाने शाळेत तक्रार पेटी सुरू करण्यात आली. सकाळच्या परिपाठावेळी आलेल्या तक्रारींचे वाचन करून शिक्षकांकडून समुपदेशन व आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श (Good Touch – Bad Touch) याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रोजेक्टरद्वारे माहितीपूर्ण लघुपट दाखविण्यात आला. या माध्यमातून अनोळखी व्यक्तींपासून सावध राहणे, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी योग्य ठिकाणी संपर्क साधणे तसेच संशयास्पद घटनांची त्वरित माहिती देण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यार्थी अमृता चव्हाण, प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थी स्नेहल सोमवंशी, तसेच संस्थापक ताराचंद शिंदे व मुख्याध्यापक मधुकर जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रेया गायकवाड यांनी केले तर आभारप्रदर्शन अविष्कार शिंदे यांनी केले.
