
अंबाजोगाईचीनवीपिढी
अंबाजोगाई
दराडेदादा म्हणजे आमच्या गुडमॉर्निंग ग्रुपचे एक अफलातून व्यक्तिमत्त्व !! चेहऱ्यावर सात्त्विक हास्य. बोलण्यात ग्रामीण ढंग पण प्रामाणिकता प्रत्येक वाक्यातून प्रगट होते. वारकरी माणूस आणि अपंग शाळेचे मुख्याध्यापक. ईश्वरावर प्रचंड भक्ती !! मागच्या महिन्यात त्यांची अँजिओप्लास्टी झाली. डॉक्टरनी चांगले दोन महिने विश्रांती सांगितली पण दादा मात्र महिना होताच मैदानावर आले. सगळ्यांशी गप्पा मारताना वाटतच नव्हतं या माणसाची अँजिओप्लास्टी झाली आहे.
दादा अंबाजोगाई तालुक्याच्या सीमेवरील दरडवाडी गावचे. नाव राजाभाऊ. नावाप्रमाणे ते मनाचे राजे. परिस्थिती खूपच बिकट. दहावी पर्यँत शिक्षण झालं मग कृषी पदविका कोर्स पूर्ण केला. अपंग शाळेवर नौकरीला लागले. पाच वर्षे विनावेतन काम केलं. आर्थिक परिस्थिती अवघड असली की भयाण अनुभव येतात. त्यातून माणसाची मानसिकता होते की आधी आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ. तसेच काहीसे होते पण घडले वेगळेच पगार सुरू झाला आणि शाळा बंद पडली. दिसाचा वेळ जाता जात नव्हता. गावात येजा वाढली. बोलका स्वभाव आणि लोकांच्या अडचणीत धावून जाणारा माणूस. असाच तरुण गावचा सरपंच असावा असे दरडवाडीच्या लोकांनी ठरवले आणि दादा सरपंच झाले. ते चांगले दहा वर्षे सरपंच होते. पाहिले पाच वर्षे तर बिनविरोध !!
यासर्वांच्या मध्ये दादांनी आपल्या मुलांना मात्र खूप शिकवायचे ठरवले. मोठा राहुल तर संगणक अभियंता झाला. आता चांगली नौकरी करून स्थिर स्थावर व्हावे अशी दादांच्याकडून राहुल बाबत अपेक्षा होती. राहुल पण पुण्यात नौकरी करू लागला. पण त्याचे मन काही त्यात रमेना !! त्याला काही तरी वेगळं करायचे होते. दादा मध्ये अजून एक वेगळी कला होती ती म्हणजे गावात नाटक बसवायची. ते स्वतःपण काम करायचे. मस्त अभिनय असायचा त्यांचा. पुढे परिस्थितीने ते त्यांना थांबवावे लागले. दादांचा हाच गुण राहुल मध्ये आला होता पण त्याने कधीच अभिनय केलेला नाही न त्यातील त्याचे प्रशिक्षण झाले.
मध्यंतरीच्या काळात सर्व जगात tiktok ने धुमकोळ घातला होता. राहुलला ते रिल्स आवडायचे. पुढे तो ते करून पाहू लागला. त्याला लक्षात आले आपल्याला यात गती आहे. विनोद हा बुध्दीचा महत्वाचा पैलू. राहुलमध्ये तो चांगलाच होता. 20 ते 25 सेकंदाच्या रिल्स मधून तो लोकांच्या मनात पक्का बसला. खास करून तरुणांच्या. शेवटी त्याने नौकरी सोडली. दादांना ते अजिबात मान्य नव्हते. त्यांनी चक्क त्याला पैसे पाठवणे बंद केले. राहुल मात्र जिद्दी होता. तो आपल्याला वाटते तेच करणार होता. त्याचा स्वतःवर व आपल्या कलेवर खूप विश्वास होता. तो काही काळात tiktok स्टार झाला. Tiktok बंद पडले. राहुल youtube आणि इन्स्ट्राग्रामकडे वळला. कुठलीही पार्श्वभूमी नसताना आणि घरचा आधार नसताना राहुल प्रचंड कष्ट करू लागला. अंबाजोगाईच्या परिसरातही त्याचे रिल्स गाजू लागले. तरुण मुलांच्या मनात त्यांनी घर केलं. लाखो लोग त्याचे चाहते झाले.
फक्त रिल्सकरणे त्याचे ध्येय नव्हते. त्याला सिनेसृष्टीत काम करायचे होते. त्याने सुरुवात केली होती नोव्हेंबर 2018 मध्ये.मधील कोविड काळ हे सगळे पाहता अवघड काळ होता पण परिस्थितीला शरण जाणारा राहुल नव्हता. त्याला पहिला चित्रपट मिळाला… कलवरी.
गेल्या काही दिवसांच्या पासून अंबाजोगाईत कलवरीचे पोस्टर दिसायला लागले. मग ग्राउंडवरील चर्चा ऐकून कळले की यातील हिरो राहुल दराडे हा दादांचा मुलगा आहे आणि तो ही मोठा. दादांनी तर त्याच्या पेक्षा लहान असलेल्या मुलाचे लग्न करून टाकले होते. मी दादांना कलवरीबद्दल विचारले. त्यांचा चेहरा एकदम फुलला. आपल्या मुलांनी नक्कीच भारी काही तरी केले याचे त्यांना समाधान होते. खरं तर राहुलच्या यशात खरा वाटा त्याच्या आईचा. ती मात्र दादांना सतत टोकत राहिली आणि राहुला प्रेरणा देत राहिली.
कलवरी चित्रपट अंबाजोगाई मध्ये उद्या म्हणजे 28 तारखेला प्रदर्शित होणार आहे. सगळ्या महाराष्ट्रभरात तो प्रदर्शित होत आहे. एकूण राहुलच्या रिल्स पाहून आणि कलवरीचे ट्रेलर पाहून राहुलच्या दमदार अभिनयाची कल्पना येते. दादा एकदम खुश आहेत. आम्ही सगळेच मित्रमंडळी रुपेरी पडद्यावर राहुलचा अभिनय पाहणार आहोत. आपण सगळ्यांनी पण कलवरी जरूर पाहावा !!
