महात्मा फुले स्मारक समिती तर्फे संविधान दिन साजरा
संविधानाने समाजात मानवी मूल्यांची पेरणी केली – डॉ.राजेश इंगोले
संविधानाने सामान्य माणसाला सन्मान मिळवून दिला :- प्रा.शैलजा बरूळे
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील महात्मा फुले स्मारक समिती, अंबाजोगाई तर्फे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विचारमंचावर सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ तथा स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले, संविधान विषयाच्या व्याख्याता प्रा.शैलजा बरूळे, रिपाइं आठवले गटाचे नेते मा.महेंद्र निकाळजे, समिती सचिव रत्नदीप गोरे, उपाध्यक्ष प्रा.अनिल नरसिंगे, कोषाध्यक्ष प्रा.डॉ.मिलिंद ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात महापुरूषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व संविधानाच्या प्रास्ताविक वाचनाने करण्यात आली. यावेळी बोलताना समितीचे अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले यांनी संविधानाने मानवी मूल्यांना बळकटी दिली आहे. प्रत्येक नागरिकास त्याचे हक्क अधिकार आणि कर्तव्य याची जाणीव करून देण्यात आलेली आहे. संविधानाने सर्वसामान्य माणसाला सत्तेचा केंद्रबिंदू बनविला आणि आपल्या जीवनात आचरण कसे असावे हे शिकवले आहे हे संविधान लिहीत असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना तब्बल तीन वर्षांचा कालावधी लागला या कालावधीमध्ये त्यांनी भारताला महासत्ता बनविण्याचा महामार्ग बनवला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखित या संविधानामुळे भारतामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता हे मूल्य रूजविली गेली आणि भारतामध्ये मानवी मूल्य पेरली गेली. भारतामध्ये अनेक जाती, पंथ, धर्म, भाषा, प्रांत असताना भारत एकसंघ आहे. याचं कारण, फक्त आणि फक्त संविधान आहे असे प्रतिपादन डॉ.राजेश इंगोले यांनी यावेळी केले. संविधान विषयाच्या व्याख्यात्या बरूळे यांनी भारतीय संविधान जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे व भारतीय संविधानाचे संदर्भ घेऊन अनेक राष्ट्रीय त्यांचा राज्य कारभार त्या पद्धतीने चालवतात या शब्दांत संविधानाचे महत्त्व विशद केले. संविधानाने सर्वसामान्य माणसाला जीवन जगण्याची प्रेरणा दिली मानवी अधिकारांची आणि कर्तव्यांचे महत्त्व समजावून सांगितले आणि याद्वारे राष्ट्राची एकात्मता कशी अबाधित राहील याकडे संविधानाने विशेष लक्ष दिले असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.किरण चक्रे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.अनिल नरसिंगे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.मिलिंद ढगे यांनी मानले. यावेळी संविधान दिनानिमित्त संविधानावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली होती यामधील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले तसेच सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी प्रा.सुनील नरसिंगे, विजय कचरे, संजयभाऊ साळवे, रामेश्वर खाडे, भाऊराव गवळी, प्रा.बि.के.मसने, प्रा.अनंत कांबळे, बालाजी भदरगे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
=======================
.

