

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- मोबाईल तथा संगणकाच्या अतिवापरामुळे आजचा युवक तथा विद्यार्थी हा मैदानी खेळापासून मोठ्या प्रमाणावर दुरावत चालला आहे. यामुळे याचा विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आरोग्य तथा आयुष्यावर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहेत. हे टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात मैदानी खेळात सहभागी व्हावे असे मत गटशिक्षण अधिकारी मधुकर सुवर्णकार यांनी व्यक्त केले. ते जिल्हा परिषद बीड अंतर्गत गट शिक्षणाधिकारी कार्यालय व शिक्षक मैत्री प्रतिष्ठान अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या तालुका क्रीडा स्पर्धांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीराम सिकची, विस्तार अधिकारी अशोक कोपले, कनाके साहेब, शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार, केंद्रप्रमुख माणिक सोळंके आदी मान्यवर उपस्थित होते.
या क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ गटशिक्षणाधिकारी मधुकर सुवर्णकार यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा समन्वयक दत्ता देवकते यांनी केले. यावेळी त्यांनी तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धांची सविस्तर रूपरेषा सांगितली. शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार यांनी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या अंगी विविध प्रकारचे मूल्य रुजवण्याचे काम होते. त्यामुळे क्रीडा स्पर्धा या शालेय विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाची भूमिका निभावतात अशी भावना व्यक्त केली.त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या शालेय जीवनात प्रत्येक क्रीडा स्पर्धा ना सामोरे जावे गरजेचे असल्याचे रापतवार यांनी सांगितले.
आपल्या अध्यक्षीय समारोपात गटशिक्षणाधिकारी मधुकर सुवर्णकार यांनी शालेय विद्यार्थ्यांनी जास्तीत मैदानी स्पर्धामध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले. आजचे युग हे संगणक व मोबाईल चे युग आहे. मात्र त्याच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतांना दिसून येत आहेत. मात्र अशावेळी शालेय जीवनात विविध प्रकारच्या शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन याप्रसंगी शिक्षणाधिकारी मधुकर सुवर्णकार यांनी विद्यार्थ्यांना केले. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक स्वास्थ व व्यक्तिमत्व विकास वृद्धिंगत होण्यास मदत होत असल्याचे देखील नमूद केले.
याप्रसंगी विस्तार अधिकारी अशोक कोपले यांनी सदरील तालुका क्रीडा स्पर्धा अतिशय निकोपपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य करावे तसेच स्पर्धेतील पंचांचा निर्णय अंतिम मानून पंचांच्या निर्णयाचा आदर करावा अशी सूचना करत उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका क्रीडा समन्वय दत्ता देवकते यांनी केले. या तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत अंबाजोगाई तालुक्यातील विविध शाळांतील शेकडो विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
पंच म्हणून क्रीडा शिक्षक श्री विजय बाबू हारे,श्री ढेंबरे सर,श्री अंकुश गायकवाड सर,श्री जी एस राठोड सर श्री प्रवीण ठोंबरे सर इत्यादींनी कार्य पार पाडले.
