१०४ गायक कलावंतांची स्व.लताजी मंगेशकर यांना सांगितिक श्रद्धांजली अर्पण
अंबाजोगाई
कोल्हापूरच्या मातीतून अनेक कलाकारांनी जन्म घेतला आणि महाराष्ट्राचं नांव सात समुद्रापार जगामध्ये नेलं असं हे सांस्कृतिक वैभव लाभलेलं कोल्हापूर या ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात आणि इथले कलाकार त्यात हिरीरीने सहभाग नोंदवत असतात. एकेकाळी कोल्हापूर हे मराठी चित्रपटसृष्टीचे वैभव होतं. या ठिकाणी अनेक ख्यातनाम दिग्दर्शक, निर्माते, संगीतकार, गायक, कलाकार निर्माण झाले. त्यांनी चित्रपट सृष्टीला एक नवा आयाम दिला. असे हे कोल्हापूरचं सांस्कृतिक सांघिक वैभव संपूर्ण महाराष्ट्राला लाभलं पाहिजे असे प्रतिपादन इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.राजेश इंगोले यांनी कोल्हापूर येथे केले. ते गानकोकिळा स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त आयोजित सांगितिक श्रद्धांजली या कार्यक्रमात व्यक्त केले. या कार्यक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये घेण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूरच्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या सरगम म्युझिकल ग्रुपच्या डॉ.आशा शितोळे, डॉ.सुभाष भाट व डॉ.परितेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर चित्रपट मंडळ यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून अंबाजोगाईचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ तसेच आयएमएचे सांस्कृतिक समितीचे राज्य अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले तर अध्यक्षस्थानी डॉ.आशा शितोळे मॅडम ह्या होत्या. कार्यक्रमाची सुरूवात स्व.लता मंगेशकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पसायदानाने झाली. यावेळी कोल्हापूरच्या संस्कृती वैशिष्ट्यानुसार कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.राजेश इंगोले यांच्या हस्ते एका वृक्षाला पाणी देऊन करण्यात आले. आपल्या उद्घाटकीय भाषणात बोलताना डॉ.राजेश इंगोले यांनी कोल्हापूर येथे आज ही विविध क्षेत्रातील मंडळी एकत्र येतात आणि कोल्हापूरची संस्कृती अशा सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे जोपासण्याचे काम करतात ही गोष्ट कौतुकास्पद आहे याचे अनुकरण संपूर्ण महाराष्ट्राने केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. कोल्हापूर हे एकेकाळी मराठी चित्रपट सृष्टीचा केंद्रस्थान होते कोल्हापूरला हे गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी येथील राजकीय नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. एखाद्या आवडत्या कलाकाराला त्याच्या मृत्यूनंतर ही जिवंत ठेवण्याचे काम त्याचे अनुयायी त्याच्या कलेला जोपासून करू शकतात. हे या कार्यक्रमाद्वारे या आयोजित मंडळींनी दाखवून दिले आहे त्यांच्या या कार्याला मी अभिवादन करतो आणि त्यांनी त्यांची सांस्कृतिक चळवळ अशीच जोमाने पुढे न्यावी या शुभेच्छा देतो. कला ही कलाकाराला मरणोपरांतही जिवंत ठेवत असते आणि ज्याच्या अंगी एखादी कला आहे असा व्यक्ती जीवनाचे ताण-तणाव विसरून कुठल्याही मोठ्या संकटाशी संघर्ष करायला तयार असतो. कारण, त्याच्या अंगातली कला ही त्याच्या ऊर्जेचे स्त्रोत असतं. त्यामुळे कलाकार हे नेहमी प्रसन्न चित्त असतात आणि ताणतणाव मुक्त असतात त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपले ताण तणाव विसरण्यासाठी अशी एखादी कला शिकून त्याला जोपासण्याचे काम करावे असे मत डॉ.इंगोले यांनी मत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय समारोपात बोलत असताना डॉ.आशा शितोळे यांनी गेल्या साडेतीन महिन्यांपासून कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, कोल्हापूर चित्रपट मंडळाचे सदस्य व सरगम म्युझिकल ग्रुपचे सदस्य हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत आज या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून तब्बल १०४ गायक कलावंतांनी सहभाग नोंदवून स्वर्गीय लताजी मंगेशकर यांना आपली सांगितिक श्रद्धांजली अर्पण केली आणि हा एक विश्वविक्रम ठरला या गोष्टीचे आम्हाला खूप समाधान आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.आशा शितोळे,डॉ.अनिता परितेकर, डॉ.अनिल कवठेकर राजकुमार पारकर, बिनॉय किनीकर, पुष्पक गवई, केटी शिंदे, माया पाडळेकर, सुषमा पाटील, राहुल मेहता, किनीकर यांच्यासह अनेक जणांनी पुढाकार घेतला.
=======================

