
नाशिक येथे सांस्कृतिक कला महोत्सवाचे उद्घाटन
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
महाकवी कालिदास सभागृहात आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेच्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सांस्कृतिक समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रमुख डॉ.राजेश इंगोले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटक म्हणून बोलताना डॉ.राजेश इंगोले यांनी आपल्या भाषणात सांस्कृतिक वारशाचे महत्त्व अधोरेखित करत डॉक्टरांच्या तरूण पिढीने आणि समाजातील प्रत्येक घटकाने त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. पुढे बोलताना डॉ.इंगोले यांनी कला ही केवळ मनोरंजनासाठी नसून ती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कला माणसाला मानसिक शांतता देते, आधार देते त्याच्या कल्पनाशक्तीला चालना देते आणि जीवनातील सौंदर्य जाणून घेण्याची दृष्टी देते. नृत्य, संगीत, चित्रकला, साहित्य यांसारख्या कला मानवाला स्वतःचा शोध घेण्याची संधी देतात. अशा कार्यक्रमांमुळे आपण आपल्या संस्कृतीच्या मुळांशी जोडले जातो आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा मिळते असे सांगत प्रत्येकाने आपल्या धकाधकीच्या जीवनात आपले सुप्तगून आणी कला जोपासली पाहिजे आणी त्याची साधना केली पाहिजे असे मत व्यक्त केले. डॉ.इंगोले यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम यापुढेही होत राहावेत, अशा शुभेच्छा देत कला ही फक्त व्यक्तीपुरती मर्यादित नसते, तर ती समाजाला आणी राष्ट्राला एकत्र बांधण्याचे काम करते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनात कलेला स्थान दिले पाहिजे. असे मत व्यक्त केले. झालेल्या यां बहारदार कला उत्सव कार्यक्रमात विविध डॉक्टर्स कलाकारांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक नृत्य, गायन, वाद्यसंगीत आणि नाट्य यांचा समावेश असलेल्या सादरीकरणांनी कार्यक्रमात रंगत आणली. विशेषतः स्थानिक डॉक्टर्सनी सादर केलेल्या नृत्य कलाकृतींनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक शाखेचे सांस्कृतिक सचिव डॉ.मिलिंद भराडिया, डॉ.आदिती वानखेडे, डॉ.परीक्षित महाजन, डॉ.पंकज चव्हाण, डॉ.अनुप भारती डॉ मंजुषा, डॉ.राजेंद्र कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरातील डॉक्टर्स कलाकारांना आपली कला सादर करण्याची उत्तम संधी मिळाली. विविध कला, संगीत, नृत्य आणि स्थानिक कला परंपरांचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा ठरला असे मत उपस्थित कला प्रेमीनी व्यक्त केले. कार्यक्रमाला शहरातील सर्व डॉक्टर्स, प्रतिष्टीत नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने कलाप्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंसचालन डॉ.मंगेश थिटे व डॉ आदिती वानखेडे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कलाकार आणि उपस्थितांचे आभार डॉ.मिलिंद भराडिया यांनी मानले.
======================
