अंबाजोगाई : तालुक्यातील श्रीपतरायवाडी येथे मंगळवारी (दि.१४) महिला दिनाचे औचित्य साधून झालेल्या विविध स्पर्धेत महिलांनी सहभाग घेऊन स्पर्धेचा आनंद घेतला. यानिमित्त आधार माणुसकीच्या उपक्रमांतर्फे विधवा मातांचा सन्मान करून त्यांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. उद्योजक प्रदीप ठोंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या
अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सुमनताई पवार या होत्या. कवी प्रा. मुकुंद राजपंखे, प्रा. सविता बुरांडे, कवयित्री शितल बोधले, जयश्री गुळवे, संध्या पवार, मयुरी मजगे, प्रेमा बर्दापूरकर, सुलक्षणा पवार, सामाजिक कार्यकर्ते मनोहर कराड यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक आधार माणुसकीच्या उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांनी केले.
सन्मान व भेट वस्तू
यावेळी महिला दिनानिमित्त गावातील विधवा माता, गरीब व गरजू १५० मातांचा सन्मान करून त्यांना ब्लँकेट भेट देण्यात आले.
यांनी मिळवले पारितोषिक
महिला दिनानिमित्त झालेल्या संगीत खुर्ची स्पर्धेत मोहर अशोक हंगे (प्रथम), लता गोविंद तारळकर (व्दितीय), सीमा संतोष पांचाळ (तृतीय), तळ्यात मळ्यात स्पर्धा : रोहिणी तारळकर (प्रथम), श्रीकन्या जाधव (व्दितीय), सोनाली जाधव (तृतीय), लिंबू चमचा स्पर्धा : अनुसया नंदकिशोर अस्वले (प्रथम), श्रीकन्या जाधव (व्दितीय), राजश्री तारळकर (तृतीय), रोहिणी अस्वले (उत्तेजनार्थ) यांनी पारितोषिक मिळवले. या पारितोषिकाचे स्वरूप गालिचा असे होते.
सावित्रीबाई व महात्मा फुलेंनी संघर्ष केल्याने महिलांना शिक्षणाची संधी मिळाली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत सर्वांना समान अधिकार दिल्याने महिलांना न्याय मिळाला. आता समाजानेही महिला, पुरूष ही विषमता दूर करून महिलांना स्वातंत्र्य दिले पाहिजे असे आवाहन प्रा. राजपंखे यांनी केले. सविता बुरांडे यांचेही भाषण झाले. शिवानंद गुळवे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकन्या जाधव व यशश्री दत्ता माने यांनी मनोगत व्यक्त केले. रामकृष्ण पवार, अनंत निकते व गावातील महिलांनी उपस्थितांचे स्वागत केले.