SALIM GAWALI

अंबाजोगाई : यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणार्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे यावर्षी ४१ वे वर्ष असून तीन दिवसीय कार्यक्रमात उद्घाटन समारंभ, कवी संमेलन, सुगम संगीत, शालेय चित्रकल व बाल आनंद.मेळावा, शेतकरी परिषद, शास्त्रीय संगीत कार्यक्रम, यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार वितरण, समारोप समारंभ असा दि.२५ ते २७ नोव्हेंबर यादरम्यान संपन्न होणार आहे. हे सर्व कार्यक्रम वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालय येथे संपन्न होतील, अशी माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली.
उद्घाटन व कवी संमेलन
यावर्षी ४१ वा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहचे उद्घाटन नांदेडचे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक, प्रसिद्ध साहित्यिक श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. रात्री आठ वाजता कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यात महाराष्ट्रातील विविध भागातील कवी सहभागी होणार आहेत. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी नांदेड येथील प्रसिद्ध कवी प्रा. डॉ. पी. विठ्ठल हे असणार आहेत. तर या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला कवी, कीर्तनकार, महावक्ता अविनाश भारती हे करणार आहेत. तर सुप्रसिध्द कवी सर्वश्री शरद धनगर–अमळनेर, पुनीत मातकर– यवतमाळ, अनंत राऊत–अकोला, डी.की. शेख– धाराशिव, लता ऐवळे कदम– सांगली, अविनाश काठवटे– छत्रपती संभाजीनगर, गुंजन पाटील– सोयगाव, गजानन मते–अमरावती, सुनील उन्हाळे–छत्रपती संभाजीनगर , सय्यद चांद तरोडकर– परभणी व आत्माराम जाधव–गंगाखेड यांचा सहभाग राहणार आहे.
